नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालाचे केंद्रीय मंत्र्यांसह भारतीय उद्योजकांनी स्वागत केले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना वंदन (सॅल्युएट) करणारे ट्विट केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की या निकालाची १.३ अब्ज लोक वाट पाहत होते. या खंडपीठात असण्यासाठी किती धाडस असेल. निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्यांनी अतुलनीय पद्धतीने मनाचा वापर केला असावा. मी त्यांना (न्यायाधीशांना) आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला वंदन करतो. त्यांनी देशातील न्याय प्रक्रिया उंचावली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. अनेक दशके सुरू असलेला कायदेशीर वाद संपुष्टात येणार आहे. लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारावा आणि शांतता राखावी, असे त्यांनी आवाहन केले. न्यायव्यवस्था, सर्व संस्था, समाज आणि या प्रकरणात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे आभार मानतो, असे गोयल यांनी म्हटले.
केंद्रीय वाहतूक, रस्ते आणि एमएमएमई मंत्री नितीन गडकरी यांनीही निकालावर ट्विट केले आहे. अयोध्येच्या निकालाचा आपण आदर केला पाहिजे. शांतता आणि स्थैर्य टिकवावे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.