वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी निर्बंध लागू केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने आणखी नवे निर्बंध लागू केले आहेत. जे विदेशातील विद्यार्थी अमेरिकेत संपूर्णपणे ऑनलाईन असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत, त्यांना देशात प्रवेश न देण्याची घोषणा अमेरिकेच्या संघराज्य पासपोर्ट कार्यालयाने केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी 9 मार्चपर्यंत ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नाही, त्यांना व्हिसा मिळणार नसल्याचे पत्र अमेरिकेच्या पासपोर्ट आणि सीमा शुल्क अंमलबजावणी संचालनालयाने महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम हा कोरोना महामारीमुळे ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांवर होणार आहे.
जे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांच्याकडे व्हिसा आहे, त्यांना संपूर्ण ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची ट्रम्प प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, बदललेल्या शैक्षणिक धोरणामुळे हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचे अनेक शैक्षणिक संस्थांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीत सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांकडून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या नियमामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अशक्य झाले आहे. दरम्यान, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थांना ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास मनाई केल्याने हॉवर्ड विद्यापीठ, गुगलसह अनेक संस्था व विद्यापीठांनी सरकारविरोधात खटला दाखला केला आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठ व महाविद्यालयांना मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घसरण होणार असल्याची शक्यता आहे.