नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याने 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारताने बंदी लागू केल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून टिकटॉक अॅप हटविले आहे, तर अॅपल कंपनीने स्टोअरवरून टिकटॉक काढून टाकले आहे. त्यामुळे टिकटॉक कंपनीला मोठा फटका बसला आहे.
गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉक सर्च केले असता अॅप तुमच्या देशात उपलब्ध नाही, असा संदेश वापरकर्त्याला दिसत आहे. असे असले तरी टिकटॉकने स्वत:हून प्ले स्टोअरवरून अॅप हटविल्याचे काही माध्यमांनी सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे. भारत सरकारने सोमवारी 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. यामध्ये टिकटॉकचा, युसी ब्राऊझर यांचा समावेश आहे. या अॅपमुळे देशाची सार्वभौमता, एकता आणि सुरक्षिततेला धोका पोहोचत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.