नवी दिल्ली- किरकोळ बाजारपेठेतील महागाई मे महिन्यात वाढून ६.३ टक्के आहे. आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेवरून हे प्रमाण जास्त आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने ही महागाई वाढल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीत म्हटले आहे.
एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण हे ४.२३ टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार मे महिन्यात अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ५.०१ टक्के आहे. तर त्यापूर्वीच्या महिन्यात महागाईचे प्रमाण हे १.९६ टक्के आहे. केंद्र सरकारने आरबीआयला किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण जास्तीत ४ टक्के तर कमीत कमी २ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
हेही वाचा-मोफत धान्यांसह लसीकरणाकरिता सरकारवर अतिरिक्त १.०५ लाख कोटींचा भार- एसबीआय
असा आहे आरबीआयचा महागाईबाबत अंदाज
आरबीआयने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) हा ५.१ टक्के राहिल असा अंदाज केला आहे. त चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सीपीआय ५.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के, चौथ्या तिमाहीत ५.३ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा-कोरोना लशीमुळे संसर्ग थांबत नाही, पण लक्षणे सौम्य होतात- संगीता रेड्डी
पतधोरण निश्चित करताना आरबीआयकडून किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा विचार करण्यात येतो. मागील महिन्यात आरबीआयने पतधोरण जाहीर करताना रेपो दर स्थिर ठेवला होता.
घाऊक बाजारपेठेतही महागाईचा भडका-
कोरोना महामारीच्या संकटातून जात असताना मे महिन्यात घाऊक बाजारपेठेतील महागाईचा नवा उच्चांक झाला आहे. मे महिन्यात १२.९४ टक्के या उच्चांकी महागाईची नोंद झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि उत्पादित वस्तुंच्या वाढलेल्या किमतीने महागाईत भर पडली आहे. चालू वर्षात मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत १२.९४ टक्के महागाईची नोंद झाली आहे. तर गतवर्षी मे महिन्यात घाऊक बाजारपेठेत उणे ३.३७ टक्के महागाईची नोंद होती. सलग पाचव्या महिन्यात घाऊक बाजारपेठेत महागाई वाढली आहे. एप्रिल २०२१ मध्ये घाऊक बाजारपेठेत १०.४९ टक्के महागाईची नोंद झाली आहे