मुंबई- केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीतून येत्या २ वर्षात १० हजार कोटी डॉलरचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ते इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बोलत होते.
गतवर्षी एफडीआयमधून निधीचा विक्रमी ओघ वाढला आहे. केंद्र सरकार हे एफआयडी गुंतवणुकीसाठी क्षेत्रनिहाय अभ्यास करत आहे. यातून विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी पोषक असे नवे धोरण तयार करण्यात येत आहे.
२०१४ मध्ये ३२ हजार ३०० कोटी डॉलर एवढ्या रक्कमेच्या वस्तुंची निर्यात झाली होती. ही निर्यात ३३ हजार कोटीहून अधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, की याबाबत मी संतुष्ट नाही. आपल्याला आणखी निर्यात वाढविणे गरजेचे आहे. यातून अधिक रोजगार निर्मिती होईल. उद्योगानुकलतेतूनही गुंतवणूक वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेशी जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक चांगल्या पद्धतीने सांगड घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गुंतवणुकीतील अडथळे दूर केले तर आपल्याला सर्वच क्षेत्रात गुंतवणूक झाल्याचे दिसून येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल हेदेखील उपस्थित होते.