काठमांडू (नेपाळ)– कोरोनामुळे अर्थव्यस्था मंदावली असतानाही नेपाळला चालू आर्थिक वर्षात 2 लाख विदेशी पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे. यामधील बहुतांश पर्यटक हे भारतीय असतील, असे नेपाळच्या पर्यटन मंडळाने म्हटले आहे.
नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिमपियाधुर या भारताच्या प्रदेशावर नेपाळने दावा केला आहे. त्यामुळे नेपाळ आणि भारतामध्ये तणावाचे संबंध आहेत. असे असले तरी नेपाळच्या पर्यटन उद्योगाची भारतीय पर्यटकांवरच भिस्त आहे.
नेपाळच्या पर्यटन मंडळाने चालू वर्षात भारतीय पर्यटक हे मोठ्या प्रमाणात देशात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात भारतीय पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कायम राहिल, असा विश्वास नेपाळ पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
नेपाळमध्ये 2019 ला 1.17 दशलक्ष विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामध्ये 2 लाख 9 हजार 11 भारतीयांनी नेपाळला भेट दिली होती. तर चीनच्या 1 लाख 69 हजार 543 पर्यटकांनी नेपाळला भेट दिली होती. पर्यटन हा नेपाळच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोत आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे येथील पर्यटन क्षेत्राला 100 कोटी नेपाळी रुपयांचा फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात पर्यटनातून 200 दशलक्ष नेपाळी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी पर्यटन मंडळाला अपेक्षा आहे.