देहरादून- जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना, त्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशमध्ये पर्यटकांचा ओघ वाढत आहे. ऋषिकेश हे उत्तराखंडमधील छोटेसे शहर तीर्थक्षेत्रदेखील आहे. जगभरातील योगप्रेमी लोक येथे योग शिकण्यासाठी येतात.
गेल्या काही वर्षात योग हा व्यवसाय म्हणून जगभरात चांगलाच स्थिरावला आहे. अशा स्थितीत ऋषिकेशमधील योग व्यवसायाची चांगली भरभराट होत आहे. येथे ३०० योग शाळा आहेत. तसेच अनेक योग प्रशिक्षण केंद्रे ही विकसित झाली आहेत. केवळ भारतामधीलच नव्हे तर जगभरातून आबालवृद्ध योग शिकण्यासाठी ऋषिकेशमध्ये येतात. ऋषिकेशमधील अनेक योग संस्था प्रशिक्षण देवून प्रमाणपत्र देतात. त्यामुळे योग म्हणजे रोजगाराचे माध्यम झाले आहे.
योग गुरू महर्षी महेश योगींनी मिळवून दिली योगाला प्रसिद्धी-
योग गुरू महर्षी महेश योगी हे ऋषिकेशमधील योग केंद्राचे संस्थापक आहेत. ते राम झुलाजवळील योग केंद्रात मोठ्या प्रमाणात विदेशातील विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांनी भारतीय योगाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तसेच प्राचीन योगाचे तत्वज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविले आहे.