नवी दिल्ली – देशात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई करण्याचे मोदी सरकारने संकेत दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने चिनी कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या मालमत्तेवर छापे मारले आहेत. चिनी कंपन्यांनी बोगस कंपन्या स्थापून मनी लाँड्रिंग आणि हवालामधून पैसे हस्तांतरित केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.
काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) चिनी कंपन्यांशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेवर छापे मारले आहेत. या छाप्यादरम्यान चिनी कंपन्यांच्या नावे 40 बोगस बँक खाती आढळल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या बोगस बँक खात्यांमधून 1 हजार कोटींहून अधिक व्यवहार करण्यात आले आहेत.