उना (हिमाचल प्रदेश) - पेंटर व प्लंबरची कामे करणाऱ्या एका मजूराला नशीब किती बलवत्तर असते, याचा अनुभव येत आहे. मुलाने निवडलेल्या तिकिटामुळे संजीव कुमार या पेंटरला २.५ कोटी रुपयांची पंजाब राज्याची लॉटरी लागली आहे. यामुळे एका रात्रीत तो कोट्यधीश झाला आहे.
संजीव कुमार हे उना जिल्ह्यातील चुरवुडी गावातील रहिवासी आहेत. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पेंटर, प्लंबर आणि इलेक्ट्रिशयनची कामे करतात. गेली तीन वर्षे ते लॉटरीमधून नशीब अजमावत आहेत. यंदा दिवाळीत त्यांना 'माँ लक्ष्मी दिवाळी बंपर २०१९' या तिकिटाचे बक्षीस लागले आहे.
हेही वाचा-पीएमसी खातेदारांना आरबीआयकडून किंचित दिलासा; पैसे काढण्याच्या मर्यादेत 'एवढी' केली वाढ
कुमार हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, मुलाला दवाखान्यात दाखवून आणल्यानंतर नांगल बसस्थानकाजवळ तिकीट खरेदी केले. यामधील एक तिकीट त्यांनी तर दुसरे संजीव कुमार यांच्या हाताने निवडण्यात आले होते. मुलाने निवडलेल्या तिकिटालाच बक्षीस लागले आहे. कुमार यांच्या कुटुंबामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई आहे. आपल्याला कधी तिकीट लागेल, याची त्यांनी कधीही कल्पनाही केली नव्हती. त्यांनी खरेदी केलेल्या तिकिटाला बक्षीस लागल्याचे जाहीर होताच त्यांना खूप आनंद झाला. तिकिटावर मिळणाऱ्या पैशांचा खर्च कसा करायचे, हे त्यांनी अद्याप ठरविलेले नाही.