नवी दिल्ली- रेल्वे स्टेशनवर देण्यात येणारी मोफत वायफायची सुविधा बंद करणार असल्याची घोषणा आज गुगलने केली आहे. ही सेवा देशामधील ४०० हून अधिक स्टेशनवरून हळूहळू बंद करण्यात येणार आहे.
मोफत वायफाय बंद होत असताना इंडियन रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर काम सुरू ठेवणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलने २०१५ मध्ये प्रथम रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायची सुविधा सुरू केली होती.
हेही वाचा-एलआयसीचा हिस्सा विकून 'एवढे' कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा
देशातील हजारो ठिकाणी दूरसंचार कंपनी आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने मोफत वायफाय देण्यात आल्याचे 'पेमेंट्स आणि नेक्स बिलियन युझर्स'चे उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, दुसऱ्या देशातील भागीदारांनी रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायची सुविधा सुरू करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. या भागीदारीबद्दल विशेषत: भारतीय रेल्वे आणि भारत सरकारबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यामुळे आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून लाखो वापरकर्त्यांची सेवा करता आली आहे.
हेही वाचा-साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी
हे आहे सेवा बंद करण्याचे कारण-
गुगलच्या दाव्यानुसार मोबाईल डाटाचे प्लॅन परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी वायफाय बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. तसेच मोबाईलची कनेक्टिव्हिटी जगभरासह भारतात वाढविण्यासाठी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रति जीबी सर्वात स्वस्त मोबाईल डाटा मिळणाऱ्या देशापैकी भारत आहे. गेल्या पाच वर्षात ट्रायच्या आकडेवारीनुसार मोबाईल डाटाचे दर ९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे सेनगुप्तांनी म्हटले आहे. दर महिन्याला भारतीय हे १० जीबी डाटाचा वापर करतात, असे एका अहवालामध्ये म्हटले होते.