मुंबई - भारतीय संघ २००४ साली पाच एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. यात भारताने एकदिवसीय मालिकेत ३-२ तर कसोटीत २-१ असा विजय मिळवला. यातील २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला. यातील दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सेहवाग त्रिशतक ठोकत मुल्तानचा सुलतान झाला होता.
या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी राहुल द्रविड नेतृत्व करत होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी भारताने २ बाद ३५० धावा केल्या होत्या. त्यात सेहवागने २२८ धावा कुटल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने त्रिशतक ठोकत पराक्रम केला. या त्रिशतकासह सेहवागने व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता येथे काढलेला २८१ धावांचा विक्रम मोडीत काढला.