सातारा- कोरोनामुळे लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. प्रवासी मजुरांचे हाल झाले. लोक बेरोजगार झाले, कारखाने बंद पडलेत. प्रवासी मजुरांना घरी पाठवण्याबाबत सरकार योग्य समन्वय राखू शकले नाही. त्यामुळे जगभरात देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत केला.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेस कमीटी प्रतिनिधी रजनीताई पवार आदी प्रमुख उपस्थित होते. कोरोनाच्या संकटाने लोकांचे रोजगार हिरावले. उद्योग धंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढावले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.