पालघर- वेळोवेळी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा पालघर तालुक्यातील माकूणसार खाडी पूल वाहतुकीकरिता पुन्हा एकदा एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल दुरुस्ती कामासाठी 21 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. पूल बंद असल्यादरम्यान केळवा-दादरापाडा पूल - भरणेपाडा जंक्शन - केळवे रोड - कपासे - सफाळे, तर दादरापाडा पूल- केळवा - दांडाखाडी - उसरणी - एडवण - दातिवरे असा पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, माकूणसार खाडीवरील पुल कमकुवत झालेला असून पुलाच्या गर्डरच्या जुन्या गंजलेल्या लोखंडी सळया तुटून पडलेल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, पुलाच्या दुरुस्तीचे काम 21 जुलैपर्यंत म्हणजेच जवळपास महिनाभर चालणार आहे.
या पुलावरून अवजड माल वाहतूक व प्रवासी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत वाहतूक अधिसूचना निर्गमित केली आहे.