पुणे- काँग्रेसच्या उमेदवाराने उपस्थित केलेल्या प्रश्नांची मी चर्चाही करू इच्छित नाही. कारण पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार हे अदखलपात्र आहेत, अशी प्रतिक्रिया पुण्याचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला पार पडणार असून, रविवारी प्रचाराची सांगता झाली आहे. त्यानंतर गिरीश बापट निवडणूक प्रचार संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बापट म्हणाले, की माझ्या विरोधी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात मी चर्चाही करू इच्छित नाही. कारण काँग्रेसचा उमेदवार अदखलपात्र आहे. मुळातच काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. उमेदवार मिळाला आहे, तर त्यांचे काम करायला कुणीही तयार होत नाही. त्यांच्याकडे विकासासंदर्भात कोणतेही विषय नसल्यामुळे त्यांच्याकडून खालच्या पातळीचे आरोप करण्यात येत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ ढवळून काढला आहे. सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी रॅलीही काढण्यात आली होती. आज मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच मतदारांना अधिकाधिक प्रमाणात मतदानासाठी बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करता येणार आहेत, असेही बापट म्हणाले.