मुंबई- अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. अशात विरोधकांकडून शालेय शिक्षण, शैक्षणिक फी, बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सरकारवर ट्विटरवरून प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.
सीबीएससीच्या मुलांना "बेस्ट आँफ थ्री" नुसार गुण मिळणार आणि एसएससी बोर्डाच्या मुलांना "बेस्ट आँफ फाईव्ह" नुसार गुण? मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार?, SSC बोर्डाच्या मुलांवर "सरासरी सरकारमुळे" अन्याय होणार, एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार? असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहे.
शाळांनी शुल्कवाढ करू नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली? या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार की, संस्था चालकांचा फायदा करणार? अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार, अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय "जैसे थे" ठेवण्यास सरकार तयार नाही असे आशिष शेलार म्हणालेत.
तसेच, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार? महाराष्ट्रात शिक्षणाचे एकूणच काय? असे प्रश देखील शेलार यांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर, पालकांना फी वाढीचा खिशाला झटका, 11 वी प्रवेशात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फटका, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार, "सरासरी" सरकार आणि निर्णय “चवली-पावली”, शिक्षणाचे इथे कसले “फेअर काय लवली “? असे प्रश्न विचारत आशिष शेलारंनी सरकारवर निशाणा साधला आहे..