मुंबई - राज्याच्या विधानपरिषदेच्या सभागृहात लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतूरा पहायला मिळणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दरारा निर्माण करणारे खोत - शेट्टी हे विधापरिषदेत एकमेकांच्या समोर बसलेले राज्याला पहायला मिळणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी (16 जून) शेट्टी यांनी भेट घेऊन विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर स्वीकारली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील शेतकरी हितासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. २०१४ मध्ये भाजपसोबत राहून निवडणूक लढवणारे शेट्टी हे काही वर्षांच्या कालावधीतच मोदी यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे त्यांच्यापासून दूर झाले होते. तोपर्यंत त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले सदाभाऊ खोत हे सोबत होते. परंतू शेट्टी यांनी भाजपपासून दूर गेल्यानंतर खोतांनी भाजपला साथ दिली. त्यात खोतांना शेट्टीपासून दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले हेाते. त्यामुळे शेट्टी-खोत वाद विकोपाला गेला होता.
दरम्यान, शेट्टी यांनी २०१९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतले होते. परंतू त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एकच जागा मिळाली होती. त्या जागेवरही शरद पवारांच्या विश्वासातील असलेल्या निवेदिला माने यांच्या मुलाने म्हणजेच ध्यैर्यशील माने यांनी शेट्टी यांचा पराभव केला. पवारांनीच शेट्टी यांचा डबल गेम करून माने यांना सेनेत पाठवले आणि त्यांना निवडून आणल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. परंतू त्यानंतरही शेट्टी यांनी आघाडीची साथ सोडली नाही. विधानसभेत शेट्टी यांच्या पक्षाला फार मोठे यश मिळाले नाही. परंतू त्यांच्या पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपचे तत्कालीन कृषि मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता.
एकीकडे खासदारकी आणि आमदारकीही नसल्याने शेट्टी मागील काळात हतबल झाल्याचे दिसून येत होते. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू तिथेही यश आले नाही. त्यांना राज्यमंत्रीपद सहज मिळणार होते. परंतू त्यांनी कॅबिनेटची अट घातल्याने ती संधीही हुकली होती. यामुळे आता ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याची ऑफर मागील काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना भेटून दिली होती. त्यानंतर आज प्रत्यक्षात निर्णय झाला असून यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.