महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

म्हैसाळ प्रकल्पातील मंगळवेढा व सांगोला वितरिकेची कामे 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा- आमदार शहाजीबापू पाटील

दरवेळी आपण माण व कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी करतो, त्याऐवजी दर वर्षी पावसाळी आवर्तनात कायमस्वरूपी माण नदीवरील मंगळवेढा पर्यंत व कोरडा नदीत पाणी सोडण्यासाठी शासकीय आध्यादेश काढावा यासाठी आपण लोकप्रतिनिधी प्रयत्न करू, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

MLA shahajibapu Patil meet
MLA shahajibapu Patil meet

By

Published : Jul 4, 2020, 4:24 PM IST

सांगोला (सोलापूर)- म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत मंगळवेढा वितरिका क्र. 1 व 2 , सांगोला वितरिका क्र. 1 व 2 व त्यावरील सर्व बंदिस्त नलिका प्रणालीची कामे येत्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत. त्याचबरोबर पावसाळी आवर्तनात म्हैसाळ योजनेतून कुभारी मार्गे कोरडा व माण नदीत पाणी सोडून त्यावरील सर्व बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आमदार अँड. शहाजीबापू पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पाकडे केली आहे.

म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत सांगोला तालुक्यातील वितरिका क्र. 1 व 2 व त्यावरील बंदिस्त नलिका प्रणालीची रखडलेली कामे व पावसाळी आवर्तनात कोरडा व माण नदीत पाणी सोडून नदीवरील बंधारे भरून देण्याच्या नियोजना संदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक - 2 सांगली येथील कार्यकारी अभियंत्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

बैठकीत सध्या सांगोला व मंगळवेढा तालुक्यात वितरिकेची सुरू असलेली कामे, बंदिस्त नलिका प्रणालीची कामे, पाणी सोडण्यासंदर्भात नियोजन या विषयावर अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. म्हैसाळ प्रकल्पात॔र्गत जत 22 हजार 500, सांगोला 4 हजार व मंगळवेढा 6 हजार असे एकूण 32 हजार 500 हेक्टर क्षेत्र कामे पूर्णत्वास गेल्यानंतर ओलिताखाली येण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी येत्या 15 ऑगस्ट पर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासित केले आहे. दरम्यान मंगळवेढा वितरिकेला आवश्यक विसर्ग देऊन उर्वरित पाणी प्रतापपूर तलाव किंवा कुंभारी मार्गे कोरडा नदीत सोडून त्यावरील छोटे मोठे बंधारे भरून देण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. तर म्हैसाळ प्रकल्प अहवालातील अपूर्ण कामे येत्या दीड महिन्याच्या आत पूर्ण करून पूर्ण क्षमतेने सांगोला, मंगळवेढा व जतच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. तसेच, 550 क्यूसेकने पाणी कसे देता येईल यासंदर्भात निर्णय झाला आहे. म्हैसाळचे पाणी कोरडा नदीला सोडण्यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संमती दिली असल्याचे सांगून या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच, म्हैसाळ प्रकल्प योजनेत सांगोला तालुक्यातील घेरडी व जवळा भागातील काही वाड्या-वस्त्या अंतर्भूत करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन शासन दरबारी पाठपुराव्याचा प्रयत्न केला जाईल. दरवेळी आपण माण व कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी करतो, त्याऐवजी दर वर्षी पावसाळी आवर्तनात कायमस्वरूपी माण नदीवरील मंगळवेढा पर्यंत व कोरडा नदीत पाणी सोडण्यासाठी शासकीय आध्यादेश काढावा यासाठी आपण लोकप्रतिनिधी प्रयत्न करू, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

येत्या 15 ऑगस्ट पर्यंत म्हैसाळ प्रकल्पांतर्गत मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत. अधिकाऱ्यांनी पाण्याचे रोटेशन देताना कालव्याची क्षमता पाहून 550 क्यूसेकने पाणी सोडले तर कोणतीही अडचण येणार नाही. त्याप्रमाणे वितरिका क्र. 69 खाली 250 ते 300 पर्यंत विसर्ग मिळेल असे नियोजन करावे व उर्वरित पाणी कोरडा नदीत सोडावे. जर आम्हाला पाणी कमी पडले तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला.

बैठकीत माजी आ. दीपक साळुंखे, जतचे आ. विक्रमसिंह सावंत, आ. भारत नाना भालके, म्हैसाळ पंपगृह- 2 चे कार्यकारी अभियंता विजय पाटील, टेंभूचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपविभागीय अधिकारी सी.ए. मिरजकर, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू मासाळ, सहा. अभियंता -1 मनोज कर्नाळे, सहा. अभियंता -2 सुभाष देवकाते, सहा. अभियंता अश्विन कर्नाळे, श्रीनिवास पवार आदि उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details