मुंबई - गेले वर्षभर मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असताना आपल्या जीवाची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करत आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. पगार वाढही करण्यात आलेली नसल्याने बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज वडाळा, कुलाबा आणि बांद्रा स्थानक येथे आंदोलन केले.
बेस्ट संकटात -
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टवर चार हजार कोटीहून अधिक कर्ज आहे. बेस्टला पालिकेने २५०० कोटीहून अधिक आर्थिक मदत केली आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक संकटातून बाहेर आलेली नाही. त्यातच कोरोनाचा प्रसार झाल्याने गेले वर्षभर महसूल कमी झाल्याने बेस्टची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यावर सामान्य प्रवाशांना बेस्टमधून जाण्याची परवानगी दिल्यावर लाखो प्रवाशांना नोयोजित स्थळी पोहोचवण्याचे काम बेस्टने केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष -
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, सामान्य प्रवाशांना नियोजित स्थळी नेण्याचे काम करत असली तरी बेस्टमधील कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ करण्यात आलेली नाही. कोविडमुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. कोविड भत्ता दिला जात नाही या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज वडाळा, कुलाबा आणि बांद्रा स्थानकातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याचा परिणाम बेस्टच्या वाहतुकीवर झाला. अनेक बस स्थानकाबाहेर पडल्या नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.
नोकरीवरुन काढून टाकू -
कर्मचाऱ्यांना पगार वाढ करण्यात आलेली नाही. कोविडमुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. कोविड भत्ता दिला जात नाही. आमच्या या मागण्या मान्य कराव्यात, अशी आमची मागणी आहे. बेस्ट तोट्यात असल्याने आमच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी कामगार नेते शशांक राव यांच्या संघटनेशी संलग्न होण्यासाठी बैठक घेतली म्हणून विष्णू मयेकर, प्रवीण होणमुखे, संदीप वीर यांच्यावर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल केले आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत म्हणून आज आंदोलन केले. आमच्यापैकी काही कर्मचाऱ्यांचे राजीनामे टाइप करून घेण्यात आले आहेत. तुम्हाला कामावरून काढून टाकू, असे धमकावल्याने कर्मचाऱ्यांनी बेस्टच्या काही गाड्या स्थानकाबाहेर काढल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.