नांदेड- आधीच कोरोनामुळे उचल नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात केळींची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहेे. त्यातच आता व्यापारी आणि केळी एजंट विविध प्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहे. त्यामुळे ही आर्थिक लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड हे तालुके देशात व विदेशात चांगल्या प्रतीच्या केळी उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील खरेदीदार आणि कमिशन एजंट यांची मोठ्या संख्येने दुकाने असल्याने येथे केळीची फार मोठी आर्थिक उलाढाल होते. सध्या कोरोनामुळे केळीच्या मालाची उचल नसल्या कारणाने अगदी कमी भावात केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केळीचे चांगले उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. पण इतर शेतमाला सोबतच केळीचे दर खूप खाली कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना केळीचे एजंट आणि व्यापारी याचा गैरफायदा घेत विविध प्रकारे शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
व्यापारी मनमानी पद्धतीने केळीच्या सध्या असलेल्या दरातूनच 60 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल कमिशन घेत आहेत. तसेच, प्रति क्विंटल केळीला प्रत्यक्षपणे न मोजताच प्रति क्विंटल 12 किलोपर्यंत दंडा व वजन कपात करून घेत आहेत. सध्या तोड आणि वाहतुकीचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात आहेत. गाडी भरताना लागणारी पत्ती न मोजताच भरली जाते आणि त्याचे जादा वजन दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत इलेक्ट्रॉनिक काट्यात रिमोटने फेरफार करून अंदाजे 10 टक्क्यांपर्यंत वजन चोरले जाते. तसेच विकलेल्या मालाची पक्की पावती न देता कच्च्या पावत्या दिल्या जातात. अनेक केळीचे व्यापारी बाहेर राज्यातून केळी खरेदीसाठी येतात. त्यांची शासन दरबारी कुठेच नोंद नसते. अनेक व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याचे प्रकार केले आहेत. या सर्व गोष्टींना एखाद्या शेतकऱ्याने विरोध केल्यास सर्व व्यापारी त्या शेतकऱ्यावर अघोषित बहिष्कार टाकून त्याचा माल उचलत नाहीत. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे बागायती शेतकरी चांगले उत्पादन निघून सुद्धा आर्थिक लूट होत असल्याने अडचणीत सापडला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जिल्हा सहकार निबंधक यांचे या लुटीकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्या कारणाने शेतकऱ्यांना कुणीही वाली उरला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी तक्रार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष्य घालून व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढावा व शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी निलेश देशमुख बारडकर, हनुमंत राजेगोरे, नागोराव भांगे पाटील, प्रवीण देशमुख, दिगंबर धुमाळ, ज्ञानेश्वर माटे, अरुण सुकळकर आदी शेतकरी उपस्थित होते.