नवी दिल्ली: एका आजारी बीएसएफ जवानाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क ( Shastri Park Area Delhi ) पोलीस स्टेशन परिसरात ( BSF Ambulance Accident Delhi ) उलटली. या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू ( BSF Soldiers Died In Accident ) झाला, तर तीन जवान जखमी झाले. यशवीर मलिक (52) आणि मनोज पासवान (32) अशी मृत जवानांची नावे आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोन्ही जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तर जखमी जवान अरुण कुमार, केएस गुप्ता आणि प्रवीण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात.. दोन जवानांचा मृत्यू डॉक्टरांनी केले मृत घोषित
मिळालेल्या माहितीनुसार, यशवीर मलिक आणि मनोज पासवान रोहिणी सेक्टर-26 मध्ये बीएसएफच्या 165 बटालियनमध्ये तैनात होते. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सर्व जवान रुग्णवाहिकेतून IBHAS हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी छावणीतून निघाले होते. मनोज पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी साडेआठच्या सुमारास शास्त्री पार्क मेट्रो डेपोसमोर रुग्णवाहिका उलटली. या अपघातात सर्व जवान जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी यशवीर मलिक आणि मनोज पासवान यांना मृत घोषित केले.
रुग्णालयातच दिली सलामी
यशवीर मलिक हे मूळचा शामलीचा असून, तो मेरठमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. ते बीएसएफमध्ये एएसआय म्हणून तैनात होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मनोज पासवान हे बिहारमधील हाजीपूरचा रहिवासी होते. ते बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. मनोज यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर छावणीतील सर्व बीएसएफ जवानांनी जीटीबी रुग्णालयातच दोन्ही जवानांना सलामी दिली.