सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील अमेठीच्या दोन कैद्यांचा बुधवारी सुलतानपूर जिल्हा कारागृहात मृत्यू झाला. माहिती मिळताच जिल्हाधिकारी जसजीत कौर आणि पोलीस अधीक्षक सोमेन वर्मा तुरुंगात पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानेही घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. कारागृहाचे पोलीस महानिरीक्षकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Suicide In Sultanpur Jail मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही : कोतवाली नगर येथील गाभाडिया परिसरात जिल्हा कारागृह आहे. येथे बुधवारी दुपारी अमेठी जिल्ह्यातील दोन कैद्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बराकीत बंदिस्त असलेल्या कैद्यांनी याची माहिती कारागृह प्रशासनाला दिली. माहिती मिळताच तुरुंग अधिकाऱ्यांनी बॅरेकमध्ये पोहोचून चौकशी केली. त्याचवेळी या प्रकरणाबाबत कारागृह अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचे म्हणणे अद्याप समोर आलेले नाही. करिया पासी आणि मनोज रायदास अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन कैद्यांची नावे आहेत. दोघेही हत्येचे आरोपी आहेत. ते अमेठी जिल्ह्यातील जामो पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले : सिटी कोतवाल राम आशिष उपाध्याय यांनी मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डीआयजी जेल हेमंत कुतियालही घटनास्थळी पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची फॉरेन्सिक टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. डीएम जसजीत कौर आणि एसपी सोमेन बर्मा यांच्या नेतृत्वाखाली नगर कोतवाली पोलिस आणि एसडीएम सीपी पाठकही घटनास्थळी हजर आहेत. एकाचवेळी दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याने कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे.
तपास अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल : तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर कैद्यांमध्येही संतापाचे वातावरण आहे. एसपी सोमेन वर्मा यांनी सांगितले की, अमेठी जिल्ह्यातील 2 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही एकाच भागातील रहिवासी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या निर्देशानुसार सुरू आहे. तपास अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल.
हे ही वाचा :
- UP Crime News : चोरीच्या आरोपावरून 23 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
- Nanded Crime : नांदेडमध्ये सशस्त्र जमावाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, 6 जण जखमी; गोरक्षक असल्याचा ग्रामस्थांचा दावा
- Nashik Crime: ऑर्थर पाठोपाठ नाशिक कारागृहातील बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल