नवी दिल्ली Tehreek e Hurriyat :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील तहरीक-ए-हुर्रियत या संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. यूएपीए अंतर्गत ही बंदी घालण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मीर मुस्लिम लीगवर (मसरत आलम ग्रुप) बंदी घातली होती.
जम्मू-काश्मीरला देशापासून वेगळं करण्याचा कट : जम्मू-काश्मीरला देशापासून वेगळं करण्याच्या कटात तेहरीक-ए-हुर्रियतचा हात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी संघटना सक्रिय असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर बंदीची घोषणा केली. "आमचं सरकार दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेवर काम करत आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारनं तहरीक-ए-हुर्रियतवर बंदी घातली", असं शाह यांनी नमूद केलं.
भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग : "तेहरीक-ए-हुर्रियत भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. ते फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात", असं अमित शाह म्हणाले. "ही संघटना दगडफेक करणाऱ्यांना प्रोत्साहन देते. तसेच कोणताही दहशतवादी मारला गेला तर इतर तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी दिशाभूल करते", असंही अमित शाह यांनी सांगितलं.
मुस्लिम लीग ऑफ जम्मू-काश्मीरवरही बंदी घातली होती : पाकिस्तान समर्थक तहरीक-ए-हुर्रियतचं नेतृत्व सय्यद अली शाह गिलानी यांच्याकडे होतं. ते फुटीरतावादी नेते होते. गिलानी यांच्या निधनानंतर या संघटनेचं नेतृत्व मसरत आलम यांच्या हाती आलं. मसरत आलम हे पाकिस्तान समर्थक मानले जातात. ते भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारनं मसरत यांच्या मुस्लिम लीग ऑफ जम्मू-काश्मीर या संघटनेवर यूएपीए अंतर्गत बंदी घालण्याची घोषणा केली होती.
हे वाचलंत का :
- ईशान्य भारतातील अशांतता होणार कमी; 'या' फुटीरतावादी संघटनेनं केली शांतता करारावर स्वाक्षरी
- गँगस्टर लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित; गृह मंत्रालयाची मोठी कारवाई