नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या सुखोई 30 एमकेआय हे भारतीय हवाई दलातील सगळ्यात घातक विमान आहे. या विमानात हवेत इंधन भरता येण्याची क्षमता आहे. सुखोईत 12 टनांपर्यंत युद्धसामुग्री वाहून नेता येते. दुसरीकडे दुहेरी इंजिन या विमानात असल्याने त्याचा पायलटला मोठा फायदा होतो. सुखोई विमान एकावेळी 3 हजार किमी उड्डाण करु शकते. त्यामुळे युद्धात त्याचा मोठा फायदा होतो. भारताला रशियाकडून 2002 मध्ये पहिले सुखोई लढाऊ विमान मिळाले. त्यानंतरही सुखोई 30 विमान अपग्रेड केल्यानंतर तर ते आणखी घातक झाले आहे. नवीन क्षेपणास्त्रांनी ते हवाई हल्ले करण्यास सुसज्ज झाले आहे.
सुखोई 30 एमकेआयमधील एमकेआयचा काय आहे अर्थ :सुखोई 30 हे रशियन बनावटीच्या विमानाचे नाव आहे. त्याच्या भारतीय आवृत्तीचे नाव सुखोई 30 एमकेआय आहे. एमकेआय म्हणजे रशियन भाषेत त्याला (Modernizirovannyi Kommercheskiy Indiski ) तर भारतीय भाषेत त्याला ( Modernized Commercial Indian) सुखोई 30 एमकेआयची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे भारतात केली जाते. रशियाच्या सुखोई कॉर्पोरेशनने 1995 मध्ये ते बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1997 मध्ये एचएएलकडून परवाना घेतल्यानंतर भारतीय वायुसेनेनुसार त्यात बदल करण्यास सुरुवात केली. सुखोई 30 एमकेआय फायटर जेट हे सुखोई एसयू-२७ ची अपग्रेडेड आवृत्ती आहे.
का भरते सुखोई 30 मुळे शत्रूंच्या मनात धडकी :सुखोई 30 या विमानाची जगभरातील 10 सर्वात धोकादायक लढाऊ विमानात गणना होते. त्यावरुनच सुखोई 30 विमानाच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे विमान भारत आणि रशियाने संयुक्तपणे बनवले आहे. भारताला आतापर्यंत 272 सुखोई - 30MKI विमाने हवाई दलासाठी मिळाली आहेत. हे 4.5 पिढीचे लढाऊ विमान मानले जाते. त्याची लांबी 72 फूट तर विंगस्पॅन 48.3 फूट आहे. उंची 20.10 फूट आणि वजन 18,400 किलो आहे. त्यामुळे सुखोई विमान किती अव्याढव्य आणि जबरदस्त आहे, हे समजून येते.
दोन हजार किमी प्रतितास वेग :सुखोई -30 एमकेआय विमानात ली युल्का एल-३१ एफपी आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन बसवण्यात आले आहे. ती विमानाला १२३ किलो न्यूटनची ताकद देते. या विमानाचा कमाल वेग ताशी 2120 किलोमीटर आहे, तर उंचावरील श्रेणी 3000 किलोमीटर आहे. या विमानात हवेतच इंधन भरले तर सुखोई-30MKI 8000 किमीपर्यंतही जाऊ शकते. त्यानंतर विमान कमाल 56,800 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.