लखनौ :2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांसोबतच आता सत्ताधारी एनडीएनेही आपली आघाडी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाले.
अमित शाहंचे ट्विट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओमप्रकाश राजभर आणि त्यांचा मुलगा अरविंद राजभर यांचे एनडीएमध्ये स्वागत केले. ओम प्रकाश राजभर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे अमित शाह यांनी ट्विट केले. 'एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो. राजभर यांच्या येण्याने उत्तर प्रदेशात एनडीए मजबूत होईल. तसेच गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल', असे अमित शाह म्हणाले.
2022 मध्ये एनडीएतून बाहेर पडले होते : विशेष म्हणजे, पूर्व उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राजभर समाजाची संख्या मोठी आहे. या समाजात ओमप्रकाश राजभर यांची चांगली पकड आहे. यामुळे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षासोबत युती केली होती. त्यानंतर त्यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही करण्यात आले. मात्र काही कारणाने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजभर समाजवादी पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र, समाजवादी पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. आता ते पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत.