नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) त्यांच्या दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ईडीने सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीसाठी नवीन समन्स बजावले होते (Sonia Gandhi to appear before ED). सुरुवातीला, त्यांना सोमवारी चौकशीसाठी येण्याचे समन्स बजावले होते. परंतु ते एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांची आज चौकशी होईल.
दोन तास चौकशी -21 जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस प्रमुखांची चौकशी केली होती. जवळपास दोन तास ही चौकशी चालली होती. सोनिया गांधी यांच्या कन्या आणि पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात त्या गेल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना सुमारे 24 प्रशन विचारण्यात आले होते. ED ने 21 जुलै रोजी सोनिया गांधी चौकशीसाठी आल्या असता दोन डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका काही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार ठेवली होती.
विविध भागात निषेध -सोनिया गांधी यांची मुलगी आणि पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनाही त्यांच्यासोबत कार्यालयात येण्यास परवानगी दिली होती. पक्षाच्या अंतरिम प्रमुखांना ईडीने समन्स बजावल्याने काँग्रेस नेत्यांनी देशाच्या विविध भागात निषेध केला होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या 75 खासदारांना आणि अनेक कार्यकर्त्यांना निदर्शने केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, अजय माकन, मणिकम टागोर, केसी वेणुगोपाल, अधीर यांचाही त्यात समावेश होता. रंजन चौधरी, शशी थरूर, सचिन पायलट आणि हरीश रावत यांनाही ताब्यात घेतले होते.