भुकेलेल्या अन्न द्या. तहानलेल्या पाणी द्या. वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या. गरीब मुलांना शिक्षणात मदत करा. प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या. बेघर असलेल्यांना आसरा द्या. अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा. बेरोजगारांना रोजगार द्या. पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या. गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा. दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे. अश्या दशसूत्रीचा संदेश समाजाला देणाऱ्या संत गाडगे महाराज उर्फ डेबूजी झिंगारजी जानोरकर यांची 23 फेब्रुवारी गुरुवार रोजी जयंती आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे...
प्राथमिक ओळख :ज्या महापुरुषांचा आधुनिक भारताला अभिमान वाटला पाहिजे, त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मानवतेचा खरा परोपकारी, सामाजिक समस्यांची प्रखर जाणीव असलेले मूर्तिमंत प्रतिक असे जर कोणी असेल, तर ते संत गाडगे बाबा होते. 23 फेब्रुवारी रोजी डेबूजी झिंगारजी जानोरकर उर्फ गाडगे बाबा यांची जंयती आहे. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव गावात एका धोबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. गाडगे बाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेले.
स्वत: पासून केली सुरुवात : गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासुन तयार केलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा. गागडे महाराज जरी गोपालाचे भजन करीत असले तरी, ते माणसात देव शोधणारे होते. ते नेहमी सांगायचे,अंद्धश्रद्धेला बळी पडू नका, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते.