नवी दिल्ली :तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या अटकेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ईडीने त्यांना आज अटक केली. अटकेनंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना बायपास सर्जरीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने सेंथिल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ईडीने अधिक चौकशीसाठी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अटकेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. बालाजींच्या समर्थनार्थ काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे, तर अण्णाद्रमुकने बालाजींना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
अटक केल्यानंतर रडू कोसळले : ईडीने जेव्हा त्यांना अटक केली तेव्हाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत बालाजी रडताना दिसत आहेत. त्यावर अण्णाद्रमुकने म्हटले की, ते नाटक करत आहेत. ज्येष्ठ नेते डी जयकुमार म्हणाले की, बालाजी एक दिवसापूर्वीपर्यंत पूर्णपणे निरोगी होते. परंतु ज्या दिवशी ईडीने छापा टाकला त्याच दिवशी त्यांची तब्येत कशी बिघडली? पक्षाचे सरचिटणीस ई पलानीस्वामी यांनीही ते नाटक करत असल्याचे म्हटले.
अटकेवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा : मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सेंथिल बालाजी यांच्या अटकेला घटनाबाह्य म्हटले आहे. त्यांनी आपल्या निवासस्थानी सर्व ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. स्टॅलिन म्हणाले की, या विरोधात ते कायदेशीररित्या लढतील. डीएमकेला काँग्रेससह अन्य पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसने याला राजकीय छळ म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जो कोणी मोदी सरकारला विरोध करतो, त्याच्यावर सूडाच्या भावनेने कारवाई केली जाते. तसेच टीएमसीनेही केंद्र सरकारचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला राज्य सरकारला त्रास देण्यासाठी उचललेले पाऊल म्हटले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.