तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या तिथे माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याही तीन आमदारांचा ही समावेश आहे. डाव्यासोबत राहून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीत आता पाला मतदारसंघावरून एलडीएफ सोबत मतभेद सुरु झाल्याच्या चर्चा माध्यमातून सुरू झाल्या आहेत.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमचा काही वाद नाही, एनसीपी आजही डाव्या लोकशाही आघाडीचा भाग आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली आहे. ते लवकरच केरळला येऊन भेट देतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. एलडीएफने अद्याप तरी जागा वाटपावर चर्चा सुरू केली नसल्याही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार कप्पन यांना पक्षाचा निर्णय मान्य-
पालाचे आमदार आणि त्यांचा समर्थक गट हा एलडीएफ सोडून यूडीएफच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या फक्त माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत. मी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करेन. तसेच जर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सध्या राष्ट्रवादीकडे असलेली पालाची जागा केरळ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तेही मला मान्य असल्याची माहिती पाला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
केरळ काँग्रेस(मणी) नेते जोस के. मणी हे सध्या पाला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. जोस के मणी यांनी नुकताच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या यूडीएफमध्ये असताना ही खासदारकी मिळवली होती. त्यानंतर आता त्यांनी एलडीएफच्या वाजूने आपले मत व्यक्त केले आहे.
२०१८ मध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी केरळ काँग्रेसला यूडीएफ सहभागी करण्यासाठी राज्यसभेची ऑफर दिली होती. त्यावेळी पालाचे आमदार असलेले दिवंगत नेते के एम मणी यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला आणि स्वत;च्या मुलाला म्हणजे जोसे के मणी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.