नवी दिल्ली :बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यावर आता तत्कालीन संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. 1992 मध्ये अयोध्येतील तेव्हाच्या वादग्रस्त वास्तूबाबत 'राम जन्मभूमी आंदोलना'ला जोर आला होता, त्यावेळी भाजपा नेत्या विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नसल्याचे आश्वासन तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना दिले होते. आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध जात पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी विजया राजे सिंधिया यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.
शरद पवार होते बैठकीला उपस्थित :ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मी तत्कालीन गृहमंत्री आणि गृह सचिवांसह बैठकीला उपस्थित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत झालेली चर्चा आजही आठवते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नीरजा चौधरी यांच्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड' या पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि भाजपाचे नेते दिनेश त्रिवेदी आदींची उपस्थिती होती.
बाबरी प्रकरणावरुन शरद पवार यांचा गौप्यस्फोट : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना त्यांच्या मंत्रिमंडळाने सल्ला दिला होता. मात्र भाजपा नेता विजया राजे सिंधिया यांनी मशिदीला काहीच होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
गृहमंत्री आणि गृह सचिवांना शंका :विजया राजे सिंधिया यांनी दिलेल्या शब्दावर पंतप्रधान नरसिंह राव यांनी विश्वास ठेवला. मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि गृह सचिवांना काहीही होऊ शकते, अशी शंका होती, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरसिंह राव यांनी बोलावलेल्या बैठकीला मी उपस्थित होतो, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
तेव्हा पंतप्रधान काय करत होते :अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचा मुद्दा अतिशय संवेदनशील झाला होता. यावेळी काही वरिष्ठ पत्रकारांसोबत पंतप्रधान नरसिंह राव यांची बातचीत झाली. यावेळी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना बाबरीबाबत विचारले असता त्यांनी आपण ते घडू दिल्याचे नरसिंह राव यांनी मान्य केल्याचा दावा निरजा चौधरी यांनी केला. यामुळे भाजपाचा एक मुद्दा कायमचा संपुष्टात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे निरजा चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपा आपले हिंदुत्वाचे कार्ड हरवून बसेल, असेही पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना वाटल्याची माहिती निरजा चौधरी यांनी दिली.