पटियाला - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत उडालेल्या खटक्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता काँग्रेस नेतृत्वाच्या प्रयत्नांनंतर अमरिंदर सिंग नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दिलजमाई होत असल्याचे दिसत आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सिद्धू पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. एपीएमसी व्यवस्था रद्द करून पंजाबमधील शेतकऱ्यांचा नाश करण्याचा कट केंद्र सरकार रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यातील थेट पेमेंट सिस्टमला विरोध दर्शविला.
जर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पेमेंट सिस्टम लागू केले गेले. तर किमान 30 टक्के शेतकर्यांना त्यांच्या पिकांचे पैसे मिळणार नाहीत. कारण, अनेक शेतकरी जमीन ठोक्याने घेऊन ती कसतात. पीडीएस यंत्रणा रद्द करून केंद्र सरकार आणखी एक गरीब विरोधी निर्णय घेणार आहे आणि त्याचा फायदा थेट बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना होईल, असे ते म्हणाले.
पीडीएस प्रणालीअंतर्गत गरीबांना तीन रुपये किलो दराने धान्य मिळते. जर या धान्याशी संबंधितवरील रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. तर गरजू व्यक्तीला बाजारपेठेतून धान्य खरेदी करावे लागेल. सवलतीच्या दराऐवजी सामान्य दराने ते खरेदी करावे लागेल. यामुळे गरजू व्यक्तीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल, असे ते म्हणाले.