मेरठ (उ. प्रदेश) : मेरठच्या परतापूर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी रात्री उशिरा एका मद्यधुंद ट्रक चालकाने कारला फिल्मी स्टाईलने धडक दिली. धडकेनंतर त्याने कार जवळपास तीन किलोमीटरपर्यंत फरपटत नेली. कारमधील चार तरुणांनी कसेबसे कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. कारमधील तरुणांनी परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कार तीन किलोमीटरपर्यंत खेचली : मेरठच्या रिठाणी चौकातून एक कार चालक यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करताच अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. धडकेनंतर ट्रकने कार ओढत नेली. सुमारे तीन किलोमीटर कार खेचल्यानंतर ट्रकचालकाने अचानक एका डंपरलाही धडक दिली. यानंतर ट्रक थांबला. कारचे मालक अनिल कुमार यांनी सांगितले की, ट्रक चालक मागून अतिशय वेगाने येत होता. त्याने त्यांच्या कारला धडक देत कार तुडवली. कारमध्ये त्यांच्यासह एकूण चार जण होते. कारमधील लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मेरठमध्ये गेल्या अनेक दिवसांत अशा दुर्घटना घडल्या आहेत.
हरिद्वारमध्ये कारची वरातीला धडक : दोन दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने लग्नाच्या वरातीला धडक दिली. गाडी एवढ्या वेगात होती की, ती एक-दोन जणांना धडकल्यानंतरही थांबली नाही. या अपघातात एका बँड सदस्याचा जागीच मृत्यू झाला. तर मिरवणुकीतील 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर काही अंतरावर थांबलेल्या स्कॉर्पिओ कारला लोकांनी घेराव घातला व कारचालक आणि त्यातील लोकांना बेदम मारहाण केली. बिजनौरमध्ये आयोजित विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर स्कॉर्पिओ कार सहारनपूरला परत येत होती. हा अपघात बहादराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. स्कॉर्पिओ गाडीत ५ जण होते. पाचही जण दारू प्यायलेले होते. वरातींनी केलेल्या मारहाणीनंतर या सर्वांनाही दुखापत झाली आहे.
मुंबई सुरत हायवेवर अपघात : गुजरातच्या वलसाड येथे मुंबई सुरत हायवेवर एक विचित्र अपघात झाला. मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे अचानक स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. हा कंटेनर रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या कारवर आदळला. मात्र या अपघातातून कार चालक बचावला आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. अडकलेल्या कार चालक व कंटेनर चालकाला बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांच्या पथकाला समजल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर हटवून पुढील कारवाई केली.
हेही वाचा :Haridwar Car Accident : भरधाव स्कॉर्पिओने लग्नाच्या वरातीला चिरडले ; एक ठार, 31 जखमी