इंफाळ Manipur Violence :मणिपूरमध्ये दोन तरुण विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधातील निदर्शनांनी गुरुवारी रात्री उग्र रूप धारण केलं. आंदोलकांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील हेनगांगमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खासगी निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही तेथे राहात नाही.
जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली : यावेळी आंदोलकांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील प्रदेश भाजपा अध्यक्ष अधिकारीमयुम शारदा देवी आणि भाजपा आमदार सोराईसम केबी यांच्या निवासस्थानांनाही लक्ष्य केलं. मात्र सुरक्षा दलानं तत्काळ हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी ठिकठिकाणी अश्रुधुराची नळकांडी फोडली. या दरम्यान सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये चकमकही झाली. सध्या मणिपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण असून, सरकारनं राज्यातील सर्व शाळा २९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारनं मंगळवारीच मोबाईल इंटरनेटवर बंदी लागू केली होती.
इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू :आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. हिंसाचाराची परिस्थिती टाळण्यासाठी मणिपूर पोलीस, सीआरपीएफ आणि जलद कृती दलाचे जवान इम्फाळ खोऱ्यात मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. मंगळवारपासून सुरू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत ६५ आंदोलक जखमी झाले असून, सुरक्षा दलांनी बुधवारी इंफाळ पूर्व आणि पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली.