नवी दिल्ली - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्हेंटिलेटर्सची मोठी आवश्यता आहे. यामुळे केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडद्वारे राज्यांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. परंतु या पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा असून निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. कित्येक रुग्णालयांमध्ये हे व्हेंटिलेटर्स धूळ खात पडलेले दिसून येत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर या दोन्हीमध्ये अनेक समानता आहेत. दोघांचा मर्यादेपलीकडे खोटा प्रचार झाला, दोघेही आपले कार्य पार पाडण्यात फेल ठरले आहेत. तसेच गरजेच्यावेळी दोघांनाही शोधणे कठीण आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा -
पीएम केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बोगस निघत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. निकृष्ट दर्जाची उपकरणे देऊन केंद्र सरकार गंभीर रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याची टीका केली जात आहे. एका व्हेंटिलेटरमुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. मात्र, दर्जाहीन व्हेंटिलेटरमुळे अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी घाबरले आहेत. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राल 400 व्हेंटिलेटर देण्यात आले होते. महाराष्ट्रात अनेक व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पंजाब सरकारने हे व्हेंटिलेटरच परत केले. तसेच गुजरातनेही हे व्हेंटिलेटर वापरण्यास नकार कळवून केंद्राला घरचा आहेर दिला आहे.
विदारक परिस्थिती -
देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मात्र, यातच लसीच्या तुडवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर सरकारने कोणतेही लसीकरण धोरण अवलंबले नसल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे.