नवी दिल्ली- संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी पेगासस हेरगिरी, कृषी कायदे यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकारकडून मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. अशातच लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आले होते. दुपारी बारानंतरही पुन्हा लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. तर राज्यसभेत खासदार हे वेल ऑफ द हाऊसमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी जमा झाले होते. सीपीआयचे खासदार बिनोय विश्वम यांनी पेगासस प्रोजक्टवर चर्चा करण्यासाठी नियम 267 नुसार राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली.
इनलँड व्हेसलचे विधयेक हे सोमवारी मंजूर झाले आहे. सोमवारी राज्यसभेचे चारवेळा कामकाज स्थगित करण्यात आले आहे. राज्यसभेत पाच विधेयके मंजूर झाली आहेत. कारखाना सुधारणा विधेयक, सागरी मदत आणि नेव्हिगेशन विधेयक, अल्पवयीन न्याय सुधारणा या विधेयकांचा समावेश आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी महागाई विरोधात कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्लब ते संसदेपर्यंत सायकल मार्च काढला आहे.