तिरुवनंतपुरम -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना केरळ सरकारने युद्धपातळीवर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. केरळने प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्य पातळीवर ऑक्सिजन वॉर रुम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी ऑक्सिजन वॉर रुम सुरू करणार असल्याचे ट्विटरवरून माहिती दिली. या वॉर रुममध्ये पोली, आरोग्य, वाहतूक, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेचे (पेसो) सदस्य असणार आहेत. या वॉर रुमच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. ऑक्सिजन मॉड्यूलमध्ये कोव्हिड जागृत पोर्टलचाही समावेश करण्यात येणार असल्याचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन
ऑक्सिजनचा नवा प्रकल्प सुरू करणार-
देशभरात दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळने अधिक काळजीपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने छट्टांचल औद्योगिक वसाहतींतर्ग कासारगोड जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-ईटीव्ही इम्पॅक्ट : बाडमेर रिफायनरीत पोहोचला ऑक्सिजन लिक्विड टँकर; बंद पडलेले तीन प्लांट होणार सुरू
दरम्यान, केरळमध्ये गुरुवारी 38,607 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा करणे अनेक राज्यांना आव्हानात्मक ठरत आहे.