मंगळुरू (कर्नाटक): भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण कुमार नेत्तारेयांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. शिहाब, बशीर आणि रियाज अशी १५ दिवसांपासून फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. मारेकऱ्यांना मदत आणि आश्रय दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी यापूर्वी सात जणांना अटक केली होती. ( BJP Activist Murder Case ) ( POLICE ARREST THREE KILLERS ) ( BJP Yuva Morcha activist Praveen Kumar Nettare )
२६ जुलै रोजी प्रवीणची हत्या झाली होती. मारेकरी दोन दुचाकीवरून आले होते. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली होती. मारेकऱ्यांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी पोलिसांच्या पथकांनी छापा टाकून त्यांना पकडले.
तीनही आरोपी स्थानिक असून प्रवीणची हत्या करणाऱ्या अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांनी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अतिरिक्त डीजीपी आलोककुमार म्हणाले होते की, आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, पोलीस राष्ट्रीय गुप्तचर संस्थेसह (एनआयए) आरोपींची मालमत्ता जप्त करणार आहेत.