महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2021, 3:55 PM IST

ETV Bharat / bharat

दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चं नवं रेस्टॉरंट पडलं बंद; पुन्हा जुन्या जागेत व्यवसाय सुरु

बाबा का ढाबा बंद करून नवे रेस्टॉरंट सुरू केलेल्या कांता प्रसाद यांच्यावर ते बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे.

कांता प्रसाद
कांता प्रसाद

नवी दिल्ली -सोशल मीडियामुळे लोकप्रिय झालेले दक्षिण दिल्लीमधील 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बाबा का ढाबा बंद करून रेस्टॉरंट सुरू केलेल्या कांता प्रसाद यांच्यावर ते बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे.

दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चं नवं रेस्टॉरंट पडलं बंद

दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदतीतून त्यांनी ढाबा बंद करत नवे रेस्टॉरंट सुरू केले. मात्र, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट तोट्यात गेल्याने कांता प्रसाद यांना ते बंद करावे लागले आहे.

गेल्या 30 वर्षांपासून सुरू होता ढाबा..

कांता प्रसाद, त्यांची पत्नी बादामी देवी आणि त्यांची दोन मुले मालवीय नगरमध्ये राहतात. गेल्या तीस वर्षांपासून कांता प्रसाद हा ढाबा चालवत होते. रोज सकाळी सहाच्या सुमारास कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी ढाब्यावर पोहोचत. ते आणि त्यांची पत्नी मिळून स्वयंपाक करत. लॉकडाऊनमध्ये कमाई होत नसल्याने त्यांच्या अडचणीसंदर्भातील एक व्हिडिओ युट्यूबर गौरव वासनने पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘बाबा का ढाबा’ला बरीच प्रसिद्धी मिळाली. या माध्यमातून कांता प्रसाद यांना तब्बल 45 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. याच पैशातून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याने रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे. दरम्यान, कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्या पैश्यावरून वाद झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details