रांची : छोट्याश्या खोलीत किंवा गॅरेजमध्ये तयार झालेल्या कंपन्यांनी कशा प्रकारे जागतिक स्तरावर कोट्यावधींची उलाढाल केली, हे आपल्याला माहित आहे. अगदी तशाच प्रकारे, झारखंडच्या विविध गावांमधील छोट्याशा घरांमध्ये तयार होणारी उत्पादने आता जगभरात पोहोचणार आहेत.
रांचीच्या नामकुम प्रांतात अवघी ३०० घरं असणारं कुटियातू नावाचं गाव आहे. या गावातील शोभा दिदीही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा सुरू होते, ती २००८मध्ये. आपल्या सासरी पोहोचताच शोभा दिदींसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. यातील सर्वात मोठी समस्या होती, ती आर्थिक अडचण. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शोभा दिदींनी कंबर कसली. त्यांना बँकेचेही कर्जरुपी सहाय्य मिळाले. आणि मग सुरू झाली सुरण, कैरी, मिरची आणि कारल्याच्या लोणच्याची प्रेरणादायी कथा!
छोट्याश्या खोलीत सुरुवात..
या व्यापारातून थोडे पैसे मिळताच शोभा दिदींनी एक छोटेसे घर बांधले. यामधील खोली छोटी असली, तरी एका मोठ्या फॅक्टरीएवढीच महत्त्वाची आहे. एसएचजीच्या महिला कर्मचारी याठिकाणी एकत्र जमतात. मेहनतीने तयार केलेले लोणचे याठिकाणी डब्ब्यांमध्ये भरले जाते. कोणी हे डबे सील करतं, तर कोणी त्यावर स्टिकर चिटकवतं. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेली ही मेहनत, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव चमकवणार आहे.
महिलांचे आयुष्य बदलले..
केवळ शोभा दिदीच नव्हे, तर या समूहातील सर्वच महिलांचे आयुष्य बदलले आहे. गावातील राहणीमान सुधारत आहे. तसेच, कित्येक दिदींची मुले आता शाळेतही जाऊ शकत आहेत. कालपर्यंत शहर आणि गावच्या बाजारांमध्ये 'हंडिया' विकणाऱ्या या महिला, आता या कंपनीत काम करत आहेत, आणि त्यांनी बनवलेली उत्पादने आता जगभरात पोहोचणार आहेत..