नवी दिल्ली Israel on Attack : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं इस्राइलला जाणारी आपली उड्डाणं रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी इस्राइलला जाणारी एअर इंडियाची उड्डाणं 14 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आलीय. या कालावधीत बुकींग केलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन एअर इंडियानं दिलंय.
इस्रायलमध्ये युद्ध स्थिती : इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी एअर इंडियाचं नवी दिल्ली ते तेल अवीव आणि तेल अवीव ते नवी दिल्लीचं परतीचं विमान रद्द करण्यात आलं होतं. हमासच्या सैनिकांची घुसखोरी आणि गाझामधून क्षेपणास्त्र हल्ले झाल्यानंतर इस्रायलनं देशात आधीच युद्ध स्थिती जाहीर केलीय. हमासनं गाझा पट्टीतून इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांनंतर, इस्रायलमधील भारतीय दूतावासानं शनिवारी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याची आणि सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्याची विनंती केलीय. अॅडवायजरीत म्हटलंय की, इस्रायलमधील सध्याची परिस्थिती पाहता इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्याची विनंती करण्यात आलीय.