नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ईटीव्ही भारत सांगितले की, 2019 पुलवामा हल्ल्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सुरक्षेत त्रुटी कशी होती. त्यांचा असा दावा आहे की, त्यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सैन्याच्या तुकड्यांना रस्त्यावरून प्रवास करण्यास सांगण्याऐवजी त्यांना विमानाने प्रवास करावा अशी मागणी केली होती. मात्र, राजनाथ यांनी विमाने देण्यास नकार दिला, असेही मलिक म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ, अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्याशी त्यांचे कामकाजाचे संबंध, फॅक्स वाद, कलम ३७० रद्द करणे, पुलवामा हल्ला, राम माधव यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, अदानी प्रकरण आणि इतरही अनेक विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. पाहुयात या मुलाखतीतील काही अंश.
प्रश्न : पुलवामा घटना हे फक्त गुप्तचर यंत्रणेचे अपयश होते का?
उत्तर:होय ही आमची सुरक्षा त्रुटी होती. सुरक्षा दलांनी यापूर्वी सीआरपीएफ जवानांसाठी विमाने मागितली होती पण राजनाथ यांनी नकार दिला आणि त्यांना रस्त्याने जावे लागले जे काश्मीरच्या बाबतीत धोकादायक पाऊल होते. ज्या भागात हा ताफा जात होता आणि ज्या भागात हल्ला झाला होता, तिथे सुरक्षा नव्हती. त्यामुळे ती आमची अक्षमता होती. त्या चुकीची शिक्षा कुणाला तरी व्हायला हवी होती. राजनाथ नाही तर सचिवांसह त्यांच्या हाताखालील लोकांना शिक्षा व्हायला हवी होती. पण आपली अक्षमता लपविण्यासाठी त्यांनी या घटनेचे खापर पाकिस्तानवर फोडले अन् त्यावर निवडणूकही जिंकली.
प्रश्न : अदानी मुद्दा हा राष्ट्रीय विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नुकसान होऊ शकते का?
उत्तर:ते बोफोर्ससारखे खोलवर गेले आहे. आगामी काळात भाजपला अडचणीत आणणारा हा मुद्दा बनला आहे. यावर पंतप्रधानांनीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि ते मूक प्रेक्षक बनून राहिले आहेत. लोक पहात आहेत आणि त्याचे परिणाम होतील.
प्रश्न: तुमची सुरक्षा कमी होत असल्याचे तुम्ही कसे पाहता? हा राजकीय सूड आहे का?
उत्तर: जगमोहन आणि इतरांसारख्या पूर्वीच्या सर्व राज्यपालांच्या सुरक्षेत कधीही घट झाली नाही. लालकृष्ण अडवाणी, गुलाम नबी आझाद आणि मुरली मनोहर जोशी हे आज संसद सदस्य नसतानाही सरकारी बंगल्यात राहतात. पण मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिल्याने मला घाबरवण्यासाठी माझी सुरक्षा काढून घेण्यात आली. सरकारला ते आवडले नाही.
प्रश्नः पंतप्रधान मोदींशिवाय भाजपमध्ये दुसरा कोणता पर्याय आहे?
उत्तर : नितीन गडकरी, तो चांगला माणूस आहे. प्रत्येकजण त्याला आवडतो. अमित शहा हेही अतिशय कर्तबगार माणूस आहेत.
प्रश्न: योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांचे काय?
उत्तर: योगी आदित्यनाथ विशिष्ट लोकांसाठी पंतप्रधान होऊ शकतात. ते पंतप्रधान झाले तर देशाला चांगले दिवस येणार नाहीत. राजनाथ सिंह हे देखील चांगले माणूस आहेत पण आता त्यांनी पूर्णपणे शरणागती पत्करली आहे. मला याबाबत काहीही बोलायचे नाही. गडकरीही पूर्वी बोलत असत पण आता त्यांनी त्यांनाही बाजूला केले आहे.
प्रश्न : भाजपच्या अंतर्गत बैठकांमध्ये कोणी आपली मते मांडतात का?
उत्तर: नाही. पंतप्रधान मोदींसमोर कोणीही बोलत नाही. ते काहीही चर्चा करत नाहीत. ते काही क्षुल्लक समस्यांबद्दल बोलू शकतात. पंतप्रधान मोदी पूर्णपणे बदलले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते वेगळेच होते. आता ते पूर्णपणे बदलले आहेत. ते गर्विष्ठ आणि सूडाने भरलेला माणूस बनले आहेत.
प्रश्न: राहुल गांधींच्या अपात्रतेबद्दल तुमची प्रतिक्रिया?
उत्तर:ते असंसदीय आणि अलोकतांत्रिक होते. संसदेत राहुल गांधींना बोलूही दिले नाही. लोकशाही अशी चालत नाही.