नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील सत्ता तालिबानच्या हाती गेली असून तेथे अराजकता पसरली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पुढील महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. भारत त्याचे यजमानपद भूषवेल. इतर अनेक देशांसह रशिया आणि पाकिस्तानलाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या प्रादेशिक परिषदेसाठी चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे मानले जाते. यामध्ये अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकटाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. याशिवाय सुरक्षेच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल.
अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पुढील महिन्यात दिल्लीत बैठक; भारताचे पाकिस्तानी NSA ला आमंत्रण
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पुढील महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. भारत त्याचे यजमानपद भूषवेल. इतर अनेक देशांसह रशिया आणि पाकिस्तानलाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रस्तावित चर्चा 10-11 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ही परिषद पूर्वी इराणमध्ये 2019 मध्ये झालेल्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेच्या स्वरुपात असेल. एनएसए-स्तरीय बैठकीसाठी आमंत्रित केलेल्यांमध्ये अफगाणिस्तानचे शेजारी रशिया, चीन, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. असे कळले आहे की पाकिस्तानचे एनएसए मोईद युसूफ यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे, जरी परिषद आणि आमंत्रणावर अद्याप अधिकृत पुष्टीकरण झाले नसले तरी तयारी सुरू असल्याचे कळते.
तालिबानकडून असलेल्या अपेक्षांची जगाला जाणीव करून दिली जाईल. तालिबानला या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. ही बैठक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावित आहे. रशियानेही 20 ऑक्टोबर रोजी मॉस्कोमध्ये अशीच परिषद आयोजित केली आहे. यामध्ये भारतासह त्याने तालिबान्यांनाही बोलावले आहे. मात्र, तालिबान्यांना येथे आमंत्रित करण्याबाबत भारत सरकार अजूनही संभ्रमात आहे. कारण तालिबानने अद्याप आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्याच्याकडून बरेच काही अपेक्षित आहे. विशेषत: मानवाधिकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात. यामध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचा समावेश आहे.