नवी दिल्ली - चीनशी झालेल्या करारानुसार पूर्व लडाखच्या पँगाँग तलाव परिसरातून सैन्याने माघार घेतली आहे. मात्र, चीनच्या हालचालींवर भारतीय लष्काराची बारीक नजर आहे. चीनने पूर्व लडाखमधील वास्तविक सीमेवर हवेत मारा करणाऱ्या एचक्यू आणि एचक्यू 22 मिसाईल तैनात केल्या आहेत. एचक्यू-9 ही रशियन एस -300 हवाई संरक्षण प्रणालीची रिव्हर्स-इंजीनियर आवृत्ती आहे. ही सुमारे 250 किलोमीटरच्या अंतरावर लक्ष्य साधू शकते.
चीनने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेवर बारकाईने नजर ठेवत आहोत. होटन आणि काशगर हवाई क्षेत्रातील लढाऊ विमानांची संख्या कमी झाली आहे, परंतु त्यामध्ये वेळोवेळी त्यात चढ-उतार दिसून येत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही देशांनी पँगाँग तलाव परिसरातून सैन्य मागे घेतले आहे, परंतु दोन्ही बाजूंनी इतर भागात सैन्य तैनात केले आहे.
गोगरा हाइट्स, हॉट स्प्रिंग्ज, डेपसांग मैदान आणि डेमचोकजवळील सीएनएन जंक्शनसह इतर क्षेत्रातून सैन्य मागे घेण्यासाठी चीनने पाऊल उचलले नाही. चीनने या क्षेत्रातून सैन्य मागे घेतल्यास भारतही आपले सैन्य मागे घेण्याचा विचार करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षापासून भारतीय व चिनी सैन्य मोठ्या संख्येने सीमेवर तैनात आहेत. सुगर क्षेत्र, मध्य क्षेत्र आणि ईशान्य क्षेत्रातील सीमांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत.