कोची (केरळ) :गुरुवारी आयकर विभागाने केरळमध्ये लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या लोकप्रिय युट्युबर्सच्या घरांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये 13 लोकप्रिय मल्याळी यूट्यूबर्सने तब्बल 25 कोटी रुपयांची करचोरी केल्याचे आढळून आले आहे. यापैकी बहुतेकांवर दोन कोटी रुपयांहून अधिक आयकराची थकबाकी आहे. अभिनेत्री आणि प्रेझेंटर परली मानी, सेबिन आणि साजू मोहम्मद यांचाही या 13 युट्युबर्सच्या यादीत समावेश आहे. तपास पथकाने 1 कोटी ते 2 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या यूट्यूबर्सच्या घरांची तपासणी केली.
युट्युबर्स कमाईनुसार आयकर भरत नसल्याचे निदर्शनास : या छाप्यांच्या माध्यमातून कर भरत नसलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याचेही समोर आले आहे. युट्युबर्स त्यांच्या कमाईनुसार आयकर भरत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले होते. यावेळी युट्युबर्सच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली. पुढील प्रक्रिया म्हणून त्यांना नोटीस देऊन पुढील कारवाई केली जाईल. कायद्यानुसार त्यांना भरावा लागणारा आयकर दंड भरून ते पुढील कायदेशीर कार्यवाही टाळू शकतात. विशेष म्हणजे, केरळमधील अनेक नामवंत यूट्यूबर्सची कमाई करोडोंमध्ये आहे.