नवी दिल्ली: संपूर्ण देश चातकासारखी मान्सूनची वाट पाहत असताना महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून 7 किंवा 8 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD) नैऋत्य मान्सूनची उत्तर सीमा लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावरून जाते. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. यासोबतच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. ढगांचे प्रमाण आग्नेय अरबी समुद्रावरही वाढत आहे. येत्या तीन-चार दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती आणखी सुधारेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ :चक्रीवादळामुळे मान्सून केरळच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ तयार होत आहे. 5 जूनच्या सुमारास दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. या परिस्थितीत केरळमध्ये 9 जूनपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह विविध ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
केरळसाठी यलो अलर्ट:हवामान खात्याने केरळसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना बदलत्या वातावरणात सतर्क राहण्याची गरज आहे. गुजरात राज्यात बायपरजॉय चक्रीवादळ येणार असून त्याचा प्रभाव गुजरातसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही दिसून येणार आहे. बियपरजॉय चक्रीवादळात वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीपर्यंत असू शकतो. हवामान विभागाने मुंबईसह कोकण समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी केला आहे.