नवी दिल्ली -गोमांस बंदी, नवीन कायदे, पंचायत निवडणुकांच्या नियमांत बदल केल्याप्रकरणी लक्षद्वीप प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. लक्षद्वीपमध्ये होत असलेल्या घडामोडींवरून अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता या वादात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी उडी घेतली आहे. लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशातील नवीन नियमांच्या मसुद्यावरून राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार समुद्रातील आभूषण नष्ट करतयं, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
लक्षद्वीप हे समुद्रातील भारताचे आभुषण आहे. सत्तेत असलेल्या अज्ञानी कट्टरपंथी हे नष्ट करू पाहत आहेत. मी लक्षद्वीपच्या जनतेसोबत उभा आहे”, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्षद्वीप प्रशासनाविरोधात पत्र लिहले आहे. तसेच लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांनी केरळमधील एलडीएफ आणि काँग्रेसच्या अनेक खासदारांसह प्रफुल्ल पटेल यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे पत्र केंद्राला लिहले होते.
प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप का?
वास्तविक, लक्षद्वीपमध्ये प्राणी संरक्षण कायदा बनविला जात आहे. यातून गाय व बैल यांच्या हत्येवर बंदी घातली जाणार आहे. तर दुसर्एका कायद्याद्वारे दारूचा व्यवसाय वाढविण्याची योजना आहे. लक्षद्वीप हा बर्याच काळापासून मद्यपान न करणारा प्रदेश आहे आणि इथले बरेच लोक मांसाहारी आहेत. तर या नव्या कायद्यामुळे येथील लोक प्रशासनाविरोधात नाराज आहेत. स्थानिक नेते प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहेत. यात खासदार मोहम्मद फैजल यांचा समावेश आहे.प्रशासन लोकांच्या खाण्याच्या परंपरा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवीन प्रशासक त्यांच्या "मनमानी पद्धतीने" कारभार करत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे लक्षद्वीपांच्या परंपरेलाही ठेस पोहचत आहे, असे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले.
लक्षद्वीपमध्ये 90 टक्के जनता ही मुस्लिम
दिनेश्वर शर्मा यांच्या निधनानंतर गुजरातचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांची नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपमध्ये 90 टक्के जनता ही मुस्लिम आहे.