हैदराबाद Guru Nanak Jayanti 2023 : गुरु नानक जयंती हा शीख बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. गुरु नानक देवजींच्या जयंतीनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. गुरु नानक देवजींचा जन्म कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता. आज कार्तिक पौर्णिमा आहे. शीख समुदाय आजचा दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा करतात. तसंच या दिवशी शीख लोक गुरुद्वारामध्ये जातात. श्रद्धेनं गुरु ग्रंथ साहिबचं पठण करतात.
त्यांचं संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी समर्पित : गुरु नानक जयंतीच्या दिवशी सर्व गुरुद्वारांमध्ये भजन-कीर्तन केलं जातं. यासोबतच सकाळी मिरवणुका काढले जाते. गुरु नानक यांचा जन्म 1469 साली तलवंडी इथं झाला. तलवंडी हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे. हे ठिकाण नानकाना साहिब म्हणून ओळखलं जातं. शीख धर्माच्या लोकांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. नानक देवजी हे संत, गुरु आणि समाजसुधारक होते. नानकजींनी आपलं संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित केलं होतं.
जातिवाद नष्ट करण्यासाठी दिले अनेक उपदेश : गुरु नानक देव यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि जातिवाद नष्ट करण्यासाठी अनेक उपदेश दिले. समाजाला नव्या दिशेनं नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची जयंती दरवर्षी प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. शीख धर्मातील हा सर्वात महत्वाचा सण आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन दरबार सजवला जातो.
नानकजींचे मौल्यवान संदेश कोणते :
- गुरु नानक नेहमी स्त्री आणि पुरुष समान मानत.
- त्यांच्या मते महिलांचा अनादर होता कामा नये.
- माणसानं नेहमी लोभ सोडला पाहिजे.
- एखाद्यानं कठोर परिश्रम केले पाहिजे आणि योग्य मार्गाने संपत्ती शोधली पाहिजे.
- प्रामाणिकपणे कष्ट करुन गरजुंनाही काहीतरी दिलं पाहिजे.
- गुरु नानक देव यांनी एक ओंकारचा नारा दिला होता.
- लोकांनी प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे.
- आपण कधीही दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊ नये.
हेही वाचा :
- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन; तब्बल एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर, पाहा व्हिडिओ
- कार्तिकी एकादशीचे काय आहे महत्त्व? तणाव मुक्तीसाठी वारी लाभदायक