हैदराबाद - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (रविवार) हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रोड शो घेतला. ग्रेटर हैदराबाद म्युनसिपल कॉर्पोरेशनची निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. भाजपचे अनेक स्टार प्रचारक हैदराबाद शहरात येऊन गेले आहेत. हैदराबाद महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे.
पुढचा महापौर भाजपचा असेल
सकाळी दहा वाजता अमित शाह यांचे हैदराबाद शहरात पोहचले. जुन्या हैदराबाद शहरातील चारमीनार शेजारील भाग्यलक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांनी पुजा केली. सिकंदराबाद येथे त्यांनी रोड शो केला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रोड शो केल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल, तसेच शहराचा पुढील महापौर हा भाजपाचा असेल. हैदराबाद शहराला निझाम संस्कृतीतून बाहेर काढू असेही अमित शाह म्हणाले.
तेलंगणात हातपाय पसरण्यासाठी भाजपचे प्रयत्न
शनिवारी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये येऊन भाजपचा प्रचार केला. त्याआधी शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी रोड शो केला. सध्या हैदराबाद महानगरपालिकेत तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणा राज्यात हातपाय पसरण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.