गांधीनगर -अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) मागील काही महिन्यांपासून तपास करत आहे. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा शोध एनसीबीकडून घेण्यात येत आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि संबंधीतांची चौकशी करण्यात आली आहे. दीपिका पदूकोन, श्रद्धा कपूर अर्जुन रामपाल यांच्यासह अनेकांची चौकशी केली आहे. एनसीबीने चौकशीनंतर मोबाईल फोनही जप्त केले होते. त्यातील माहिती मिळविण्यात गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबला आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मोबाईलमधील डेटा हस्तगत -
मोबाईलमधील माहिती मिळवण्यासाठी एनसीबीने गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेची (फॉरेन्सिक लॅब, एफएसएल) मदत घेतली होती. मोबाईलमधील जुनी माहिती हस्तगत करण्यात एफएसएलला यश आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन डिस्कमध्ये ही माहिती जमा करून एनसीबीच्या ताब्यात दिली आहे. सुमारे दोन वर्ष जुनी माहिती या सीडीमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे.
ड्रग्ज कनेक्शन शोधण्यात मदत होणार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८५ मोबाईल आणि २५ अमली पदार्थांचे नमुने तपासासाठी एनसीबीने ताब्यात घेतले होते. अमली पदार्थ तस्करी संबंधी महत्त्वाची माहीती या फोनमधून मिळू शकते, त्या दृष्टीने एनसीबीने तपास सुरू केला आहे. सुशांतसिंह आत्महत्येची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोमितकडून पहिल्यांदा सुशांतला ड्रग्ज मिळाल्याचेही समोर येत आहे. त्यानंतर अनेक चित्रपट सृष्टीतील तारकांची नावे यातून पुढे आली आहेत.
श्रद्धा कपूर आणि दीपिका पादूकोणच्या मोबाईलची तपासणी -
हाती आलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने रिया चक्रवर्ती, शोमित चक्रवर्ती, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर, दिपिका पदूकोन आणि तिच्या मित्राचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी हे सर्व फोन पाठविण्यात आले होते. या मोबाईमधील माहिती हस्तगत करण्यात आली असून ती एनसीबीकडे सूपूर्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.