हैदराबाद (तेलंगणा) : वयाच्या 6 व्या वर्षी मोहम्मद दानिश तेलंगणातील नारायणपेठ येथून बेपत्ता झाला होता. तो आत्तापर्यंत मुंबईतील एका केअर सेंटरमध्ये राहत होता. अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघात कागदपत्रे तपासताना त्यांच्या आई वडिलांचा तपास लागला. 15 वर्षांच्या दानिशची त्याच्या पालकांसोबत भेट झाली. आधारमधील बायोमेट्रिकमुळे हरवलेल्या मुलाचे आई-वडील सापडले आहेत.
16 डिसेंबर 2014 रोजी बेपत्ता झाला होता : मोहम्मद दानिश 16 डिसेंबर 2014 रोजी घरातून बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो न सापडल्याने पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली. मोहम्मद दानिश हा हैदराबादहून ट्रेनने मुंबईला पोहोचला. तेथे त्याला चाइल्ड केअर सेंटर (CWC) अधिकाऱ्यांनी उचलून शाळेत दाखल केले. तो सध्या नववीत शिकत आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या आधार बायोमेट्रिक्सद्वारे त्याचा पत्ता शोधण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले होते. मात्र ते निष्फळ ठरले.
अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी निवड : नुकतीच त्याची अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी निवड झाली आहे. संघात त्याचा समावेश करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे पालक आणि मूळ ठिकाण शोधणे आवश्यक होते. त्यांना हे तपशील केअर सेंटरच्या अधिकार्यांकडून मिळू शकले नाहीत. परिणामी, फुटबॉल संघाने मुलाच्या नवीनतम बोटांच्या ठशांची चाचणी घेतली. त्यात त्याचा आधार क्रमांक आणि त्याच्या पालकांचा तपशील आढळला. नारायणपेटा जिल्हा मुख्यालयातील बहरपेट येथे वडिल मोहम्मद मोईज पत्नी शबाना यांसोबतच राहत होते.