बेळगाव - आठ शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेळगावमधील काकती पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेळगाव महानगरपालिकेसमोर कनड्ड संघटनेने झेंडा उभारल्याच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. बेळगावात भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका कार्यर्त्यांनी घेतली होती. पोलीस आणि कार्यकर्त्यांत त्यानंतर झटापट झाली होती.
बेळगाव महापालिकेसमोरील झेंड्याला आक्षेप -
दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आंदोलन केले होते. बेळगाव महापालिकेसमोर कर्नाटकचा झेंडा उभा करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. सीमा ओलांडून बेळगावात जाण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले होते. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय देवनेसह आठ जणांविरोधात आता बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बेळगावात भगवा ध्वज फडकावणार -
कोणत्याही परिस्थितीत बेळगाव मध्ये भगवा ध्वज फडकल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. कर्नाटक पोलिसांनी गुंडगिरी करून शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा शिवसेनेने दिला होता. शिवसेनेचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसण्याच्या तयारीत असतानाच कर्नाटक पोलीस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट उडाली होती. यावेळी कर्नाटक सरकारने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वर लाठीमार केला होता.
महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना आपल्या हद्दीतून बाहेर घालवावे, अशी विनंती शिवसेनेच्या नेत्यांनी केली. जोपर्यंत बेळगाव महापालिकेसमोरील कन्नड संघटनेने उभा केलेला ध्वज उतरून घेत नाहीत व त्या ठिकाणी शिवसैनिक भगवा ध्वज फडकत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. कर्नाटक भाजप सरकारने शिवसैनिकांच्यावर दबावतंत्र वापरून गुंडगिरी करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. दरम्यान जवळपास दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली होती.